https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जमातवाद अर्थ व स्वरूप, उदयाची कारणे, कार्यपद्धती आणि निवारणासाठीचे उपाय Communalism Meaning,nature, Causes of rises


 

जमातवाद अर्थ व स्वरूप, उदयाची कारणे, कार्यपद्धतीआणि निवारणासाठीचे उपाय 

       जमातवाद ही राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला आव्हान करणारी महत्वपूर्ण प्रवृत्ती मानली जाते. जमातवाद प्रवृत्ती भूतकालीन वृथा अभिमानावर आधारलेली प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीच्या आधारावर आपली भाषा, संस्कृती, वंश, जमात आणि धर्म श्रेष्ठ हा दावा केला जातो. जमातवादाच्या माध्यमातून वंशश्रेष्ठत्वाचा अभिनिवेश प्रकट केला जात असतो. जमातवादी भावना परंपरेच्या अतिरेकी अभिमानातून निर्माण होते. त्यामुळे ती विज्ञान व मानवतेच्या विरोधी असते. जमातवादातील परंपरा व ऐतिहासिकतेचा प्रभाव पाहता ती समाजविरोधी, प्रगतीविरोधी आणि परिवर्तनविरोधी मानली जाते. जमातवादाच्या माध्यमातून संकुचित निष्ठा निर्मिती होत असल्याने ही प्रवृत्ती राष्ट्रहितासाठी अत्यंत घातक मानली जाते. जमातवादी लोक राजकीय शक्ती संपादन करण्यासाठी धर्म, भाषा व वंश या पारंपरिक आधाराचा वापर करतात. धार्मिक व वांशिक तेढ निर्माण करून आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतात. सनदशीर मार्गानी ध्येय साध्य होत नसेल तर हिंसाचार व दहशतीचा आधार घेऊन आपले हित साध्य करण्याचा प्रयत्न करतात. जमातवादाच्या माध्यमातून राजकीय शक्तीचे संघटन व प्रदर्शन केले जात असल्यामुळे ही प्रवृत्ती राष्ट्रीय दृष्टिकोनातून विघातक मानली जाते.

       जमातवाद अर्थ व स्वरूप-जमातवाद म्हणजे विशिष्ट धर्म, वंश, संस्कृती मानणारा समुदाय देशापेक्षा आपल्या धर्म संस्कृतीला प्राथमिकता देत असतो आणि अन्य धार्मिक समुदायापेक्षा अलग श्रेष्ठ मानून आपल्या समुदायाच्या हित पूर्तीसाठी सांप्रदायिकतेला चालना देण्याचे काम करत असतो. म्हणून रिबर्ड लॅम्बर्टसारखे विचारवंत 'समाजविरोधी प्रतिक्रिया विरोधी विचारांना जमातवाद म्हणतात. जमातवाद विचारसरणी संकुचित, मर्यादित आणि आक्रमक स्वरूपाची मानली जाते. सत्ता संपादन करण्यासाठी जमातवादाचा आधार घेतला जातो. उदा. हिटलरने ज्यू धर्मीयांविषयी द्वेषाची भावना विकसित करून जर्मनीत सत्ता संपादन केली. जमातवादी धर्म, वंश आणि संस्कृतीच्या आधारावर राजकीय पक्ष सामाजिक संघटनांची उभारणी करण्याचे काम करत असतात. विविध धर्मीयांमध्ये सांप्रदायिक दंगे घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असतात. धार्मिक स्थळासंबंधी मतभेद वाविवाद निर्माण करून विविध समुदायामध्ये तणाव निर्माण करण्याचे काम करीत असतात.

       जमातवादाच्या उदयाची कारणे -जमातवादाच्या उदयाला पुढील कारणे कारणीभूत मानली जातात.

       ब्रिटिश राजवट- भारतात जमातवादी प्रवृत्तीचे बीजारोपण ब्रिटिश राजवटीच्या काळात झालेले दिसते. ब्रिटिशांनी 'फोडा आणि झोडा' प्रवृत्तीच्या आधारावर धर्मा-धर्मात जाती-जातीत वैरभावना निर्माण केली. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, मुस्लीम व शिखांसाठी धर्माच्या आधारावर स्वतंत्र मतदार आणि जातीय निवाड्याच्या माध्यमातून मागास जातींना दिलेल्या सवलती इत्यादी माध्यमातून ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लीम, हिंदू-शीख आणि हिंदू मधील सुवर्ण मागास जाती यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी वेगळेपणा निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे जमातवादाची पाळेमुळे भारतात कायमची रुजली

       आर्थिक मागासलेपणा- आर्थिक मागासलेपणा हा जमातवादाच्या उदय विकासासाठीचा पोषक घटक मानला जातो. देशाच्या विकासाची फळे सर्वांना सारख्या प्रमाणात प्राप्त होणे आवश्यक असते. परंतु भांडवलशाही विकास प्रतिमानातील स्पर्धा विषमतेमुळे संतुलित विकासाऐवजी असंतुलित विकास होतो. समाजातील मूठभर लोकांकडे सत्ता संपत्तीचे केंद्रीकरण होते. समाजातील काही घटकांचा विकास आणि काही घटक हे अविकसित भांडवलशाही व्यवस्थेतील सार्वत्रिक चित्र आहे. विकासापासून पछाडलेल्या समाज घटकांना नोकऱ्या व्यवसाय, राजकारण विविध क्षेत्रात अपेक्षित प्रतिनिधीत्व मिळत नाही. आर्थिक विकासा अभावी बेरोजगारी व दारिद्रय निर्माण होते. आर्थिक मागासलेपणातून त्या वर्गात निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेऊन जमातवादी आपल्या विचारांची पेरणी करतात. आपल्या मागासलेपणास इतर वंश, धर्माचे लोक जबाबदार आहेत त्यांना केल्यास आपला विकास साधता येईल अशी मांडणी करून जमातवादाचा प्रसार करतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशात जमातवाद विकसित होण्याची शक्यता असते.

       धार्मिक व सामाजिक मागासलेपणा- ज्या समाजात रूढी, प्रथा, परंपरा, धर्मांधता, अंधश्रद्धेचे प्राबल्य आहे अशा समाजात जमातवाद विकसित करणे सहज शक्य असते. धार्मिक भावनांना आव्हान करून लोकांची एकजूट साध्य करता येते. धर्माच्या आधारावर अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक, श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भाव विकसित करणे सहज शक्य असते. कारण धर्म, जात, वंश, संस्कृतीबाबत मानवाचे मन अत्यंत संवेदनशील असते. मानवी संवेदनेचा चातुर्याने आपले ध्येय साध्य करण्यासाठी वापर करण्याचे कौशल्य जमातवादी शक्तीकडे असते. म्हणून ज्या समाजात धर्मसुधारणा, प्रबोधनवादी विचार, विवेकशक्तीला महत्त्व नसणे आणि विज्ञानवादाचा अभाव असतो त्या समाजात जमातवादाचे लवकर बीजारोपण होते.

       सत्तालोलुप राजकारण- सत्तांध राजकारणामुळे जमातवादाला प्रोत्साहन मिळते. सत्ताप्राप्तीसाठी राजकीय अभिजन धर्म, वंश, भाषा, जात संस्कृती या जमातवाद निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर करीत असतात. जनतेच्या भावना उद्देपीत करून विशिष्ट समाजाची एक गठ्ठा मते मिळविण्याचा प्रयत्न करतात, अल्पसंख्याकांचा अनुनय, धार्मिक व जातीय आधारावर सोयी सवलतींची घोषणा इत्यादींचा वापर सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करत असतात आणि यामुळे जमातवादाला प्रोत्साहन मिळते हे लक्षात घेत नाही.

       राजकीय अभिजनाचे वर्तन- भारतात बहुसंख्य राजकीय पक्षांचे नेतृत्व परंपराप्रधान, सरंजामशाही आणि घराणेशाही प्रवृत्तीला मानणाऱ्या अभिजनाकडे आहे. हे राजकीय अभिजन पारंपरिक राजकीय आधाराचा वापर करून (धर्म, जात, वंश) आपली मतपेटी व राजकीय मक्तेदारी विकसित करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भारतात धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पाया बळकट होऊ शकला नाही. स्थानिक व प्रादेशिक पातळीवरील राजकीय अभिजन संकुचित भावनांना प्रोत्साहन देण्याचे काम देखील करीत असतात. राजकीय अभिजनाच्या वर्तनामुळे जमातवादाला पोषक वातावरण निर्माण होते.

       सत्तेच्या योग्य विभागणीचा अभाव- आर्थिक विकास, शिक्षण व राजकीय जागृतीमुळे सर्व समाजघटकांच्या राजकीय आकांक्षा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. या अपेक्षेनुरूप सत्तेची फेररचना करून सत्ता वंचित घटकांना योग्य वाटा न दिल्यास हा वर्ग असंतुष्ट बनत जातो. भारतात सत्ता विशिष्ट कुटुंब, जाती व धार्मिक गटांकडे केंद्रित झाल्यामुळे इतर घटक सत्तेपासून वंचित आहेत. या सत्ता वंचित गटाच्या अपेक्षा फुलवून त्यांना आक्रमक बनविण्याचे काम जमातवादी संघटना करताना दिसतात.

       जमातवाद्यांचे कार्य व कार्यपद्धती- जमातवादी सर्वसामान्य नागरिकांना भ्रमित करून राष्ट्रीय प्रवाहापासून अलग करण्याचे प्रयत्न करतात. त्यासाठी ते समाजातील भावनिक प्रश्नाला हात घालतात. भावनिकतेच्या आधारावर समाजघटकांना संघटित करणे सहज सोपे असते, वंचित, शोषित वा उपेक्षित समाज घटकापर्यंत पोहचण्यासाठी जमातवादी विधायक कार्याचा आधार घेतात, शाळा, दवाखाने, महाविद्यालये, शिबिरे इत्यादी सेवाभावी कार्याच्या माध्यमातून जनतेची मने जिंकून हळूहळू सांप्रदायिक तत्त्वांचा प्रचार व प्रसार करतात. अज्ञानी, गरीब व भोळ्याभाबड्या लोकांना विविध प्रकारची लालूच दाखवून जमातवादी त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्या मदतीने जातीय दंगली, हिंसाचार, परधर्मीयांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला वा त्यांची विटंबना इत्यादी घडवून आणतात. जमातवादी परधर्मातील आदर्श व्यक्ती, प्रतिमांवर हल्ले करतात. धर्माधर्मामध्ये, वंशावंशामध्ये वा पंचापंथामध्ये तणाव व अविश्वासाची भावना निर्माण करण्याचे कार्य करतात. जमातवादी प्रवृत्तीमुळे राष्ट्रीय जीवनात साशंकता, भय व अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे ही प्रवृत्ती राष्ट्रीय एकात्मतेला आव्हानित करणारी आहे. तसेच या प्रवृत्तीमुळे शत्रुत्वाची भावना आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असल्यामुळे राष्ट्रीय संरक्षणाला धोका पोहचतो.

       जमातवादाच्या निवारणासाठीचे उपाय-जमातवाद समस्येचे मुळापासून निवारण करण्यासाठीपुढील उपाय सुचविले जातात.

       १. जमातवादी प्रवृत्तीचे निर्मूलन करण्यासाठी व्यक्तीमधील धर्माध प्रवृत्ती नष्ट करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेचे प्रबोधन करून त्यांच्यात विज्ञानवादी व विवेकवादी प्रवृत्तीचे बीजारोपण करणे आवश्यक आहे.

       २. शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे कारण शिक्षण प्रसारामुळे अनिष्ट रूढ्या प्रदा व परंपरा नष्ट होण्यास हातभार लागेल.

       ३. संतुलित आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास दारिद्रय व बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल. हे प्रमाण कमी झाल्यास जमातवादाला आळा बसेल.

       ४. राजकीय सत्तेत सर्व समाजघटकांना योग्य वाटा दिला आणि सर्वांना राजकीय सहभागाची संधी उपलब्ध करून दिली तर जमातवादाचा प्रभाव कमी होईल.

       ५. उदारमतवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही तत्त्वावर राष्ट्र व समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केल्यास जमातवादी शक्तींचे निर्दालन करणे शक्य आहे.

       ६. अल्पसंख्याकांचे राष्ट्रीय प्रवाहात सामिलीकरण करणे गरजेचे आहे कारण जोपर्यंत त्यांचे योग्य पद्धतीने सामिलीकरण होत नाही तोपर्यंत ही समस्या नष्ट होणार नाही. त्यासाठी अल्पसंख्याकांच्या मनातील बहुसंख्याकांबद्दलीची भीती व गैरसमज दूर करणे, त्यांच्या जीवित व मालमत्तेला संरक्षण उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य मान व सन्मान देणे. सत्तेत रास्त वाटा देणे आणि त्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देणे इत्यादी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

       ७. मानवता, शास्त्रीयता, विज्ञाननिष्ठा, लोकशाहीकरण इत्यादी मूल्यांची पेरणी, शिक्षण, मनोरंजन, प्रसिद्धी माध्यमे व सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून योग्य पद्धतीने केल्यास जमातवादाला निश्चित आळा बसू शकतो.



 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.