राजकीय सामाजीकरण अर्थ, स्वरूप आणि प्रकिया
Political Socialization
राजकीय सामाजीकरण संकल्पनेचा अभ्यास १९६० नंतर राज्यशास्त्रात मोठ्या
प्रमाणावर होऊ लागला. राजकीय समाजशास्त्र ही स्वतंत्र ज्ञानशाखा १९६० नंतर
राज्यशास्त्रात उदयाला आली. त्यामुळे राजकीय सामाजीकरण संकल्पनेचा शास्त्रीय
पद्धतीने अमेरिकन विद्यापीठामध्ये अध्ययन सुरू झाले. राजकीय संस्कृतीप्रमाणे
राजकीय सामाजीकरणाची संकल्पना आधुनिक राजकीय विश्लेषणात महत्त्वपूर्ण मानली जाते.
व्यक्तीचे वर्तणूक, दृष्टिकोन वा मते
यावर तिला मिळालेली शिकवण व आलेल्या अनुभवातून विकसित होत असतात. म्हणजेच
व्यक्तीचे व्यक्तिमहत्त्व घडविण्यास सामाजीकरणाची प्रक्रिया महत्त्वपूर्ण भूमिका
बजावत असते. प्रत्येक राजकीय व्यवस्थेला आपली स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी आणि
जनतेकडून अधिमान्यता मिळविण्यासाठी व्यवस्था अनुकूल मूल्याचे बीजारोपण करणे गरजेचे
असते. राजकीय सामाजीकरण प्रक्रियेच्या माध्यमातून राजकीय व्यवस्था व्यवस्थेस
अनुकूल मूल्यास जनतेची मान्यता मिळावी म्हणून प्रयत्नरत असते. म्हणून प्रत्येक
राजकीय व्यवस्था लोकांचे विशिष्ट दिशेने सामाजीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष मार्गाचा अवलंब करीत असते. आल्मंड यांनी राजकीय संस्कृती व
संस्कृतीच्या संरचना टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने आणि लोकांमध्ये नवीन
मूल्यव्यवस्था विकसित करण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजीकरणाच्या प्रक्रियेला
मध्यवर्ती स्थान दिलेले आहे.
राजकीय सामाजीकरण म्हणजे काय ?:
सामाजीकरण ही एक जुनी संकल्पना आहे. तिचा अभ्यास समाजशास्त्रात
केला जात असे. सामाजीकरण संस्काराशी निगडित असलेली प्रक्रिया आहे.
समाजाचा एक घटक म्हणून पात्र होण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, मूल्य व वर्तनप्रकार
ज्या प्रक्रियेद्वारा व्यक्ती शिकत असते त्याला सामाजीकरण असे म्हणतात. सामाजीकरण
प्रक्रियाद्वारे समाज जीवनात मूल्याचे सातत्य पिढयापिढया टिकवून ठेवण्याचा प्रयत्न
केला जातो. प्रत्येक नवी पिढ़ी आधीच्या पिढीकडून संस्कृतीचा वारसा घेते आणि
नंतरच्या पिढीकडे ती संक्रमित करते. ही प्रक्रिया अखंडपणे सुरू राहते. ही
प्रक्रिया जाणते अजाणतेपणे घडत असते. सामाजिक जीवनाशी प्रस्तुत असलेले सहजशिक्षण
म्हणजे सामाजीकरण होय. सामाजीकरण प्रक्रियेचा जो भाग राजकीय जीवनाशी संबंधित असतो
त्याला राजकीय सामाजीकरण म्हटले जाते. आधुनिक काळात राजकीय सामाजीकरण संकल्पनेचा
अभ्यास राज्यशास्त्र दुसऱ्या महायुध्दानंतर होऊ लागला. समाजातील वेगवेगळ्या
घटकांकडून राजकीय माहिती व मूल्य लोकांमध्ये जाणीवपूर्वक रूजविण्याची प्रक्रिया
म्हणजे सामाजीकरण होय. राजकीय व्यवस्थेबदलचा दृष्टिकोन व श्रद्धा निर्माण होण्याची
किवा राजकीय श्रद्धा व दृष्टिकोन विकसित होण्याची प्रक्रिया म्हणजे राजकीय
सामाजीकरण होय. समाजातील विविध घटकाकडून राजकीय माहिती, राजकीय
मूल्य आणि राजकीय व्यवहार लोकांत जाणीवपूर्वक पद्धतीने रुजविण्याचा प्रयत्न केला जात
असतो. औपचारिक, अनौपचारिक पद्धतीने राजकीय शिक्षण देण्याच्या
प्रक्रियेला राजकीय सामाजीकरण असे म्हणतात.
राजकीय सामाजिकरण अर्थ व व्याख्या:-
१) आईस्टाईन- प्रत्येक मनुष्य दुसन्या मनुष्याच्या सहवासात
आल्यानंतर जे शिकतो किंवा त्यांच्याशी जे काही संसूचन करतो ते शिक्षण आणि संसूचन
म्हणजे राजकीय सामाजिकरण होय.
२) डेव्हिड ईस्टन-
व्यक्तीचा राजकीय पिंड घडवणारी आणि व्यक्तीलाराजकारणाबद्दल ज्ञान प्राप्त करून
देणारी प्रक्रिया तसेच आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत प्राप्त होणारे ज्ञान म्हणजे
राजकीय सामाजिकरण होय.
३) रुश व अल्थॉफ- व्यक्तीस राजकीय व्यवस्थेची ओळख ज्या प्रक्रियेमुळे होते
व राजकारणाविषयी व्यक्तीची संवेदना व प्रतिक्रिया जी प्रक्रिया ठरविते.ती
प्रक्रिया म्हणजे राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया आहे.
थोडक्यात ज्या प्रक्रियेद्वारे व्यक्ती राजकीय व्यवस्थेशी परिचित होते, राजकारणाचे तिला ज्ञान प्राप्त होते आणि
राजकारणाविषयी तिच्या प्रतिक्रिया ठरतात त्या प्रक्रियेला साधारणत: राजकीय
सामाजीकरण मानले जाते. राजकीय सामाजीकरण म्हणजे व्यक्तीला आयुष्याच्या प्रत्येक
टप्प्यावर मिळणारे सुप्त वा उघड किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मार्गाने मिळणारे
राजकीय शिक्षणाचा समावेश होता तसेच गैरराजकीय संस्थाकडून व्यक्तीचे राजकीय
व्यक्तिमत्त्व विकसित करण्यास हातभार लावणाऱ्या घटकांचाही समावेश राजकीय सामाजीकरण
संज्ञेत केला जात असतो.
राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया:-
राजकीय सामाजीकरण ही आधुनिक युगातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे.
राजकीय सामाजीकरण ही एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पुढील मार्गाने घडत
असते.
१) सतत घडणारी प्रक्रिया :- राजकीय सामाजीकरण हे सतत घडत असते.
त्यात कधीही खंड पडत नाही. ही प्रक्रिया एक शैक्षणिक प्रक्रिया असल्यामुळे कधीही
खंड पडत नाही. म्हणून ही प्रक्रिया स्थिर नसून गतिमान असते. राजकीय व्यवस्थेच्या
अस्तित्व सातत्यासाठी ती विविध कार्य पार पाडीत असते. तसेच व्यवस्थेच्या
संवर्धनासाठी नवीन नवीन राजकीय भूमिका वा दृष्टिकोन जनतेत रूजविण्याचा प्रयत्न सतत
सुरु असतो. त्या प्रयत्नातूनही व्यक्तीच्या राजकीय सामाजीकरणास सहाय्य मिळत असते.
मनुष्य जन्मभर शिकत असतो. लहानपणा पासून ते वृद्धकाळा पर्यंत त्यांचे शिक्षण चालू
राहते. राजकीय मूल्य आणि दृष्टिकोन निर्माण करण्याची प्रक्रिया संतत चालू असते. या
प्रक्रियेवरच व्यक्तीची राजकीय प्रगल्भता, राजकीय वर्तन आणि राजकीय व्यक्तिमत्त्व अवलंबून असते. व्यक्ती राजकीय
सहभाग देखील राजकीय सामाजीकरण प्रक्रियेवर आधारित असतो. उदा. कुटुंबात लहान मूल
निष्ठा, आज्ञापालन हे गुण शिकते वडिलाबद्दल मुलांत निष्ठा
असेल तर मोठेपणी नेत्याबद्दल त्यांच्या मनात निष्ठा निर्माण होते. बालपणी व
तरुणपणी संस्कार लवकर होतात. कारण त्यांचे मन अधिक संस्कारक्षम असते. वाढत्या
वयाबरोबर ज्ञान व अनुभव वाढत जातो. म्हणून वृद्ध व प्रौढ माणसाची मने निश्चित
असल्याने ते शिकण्यापेक्षा शिकविण्याच्या स्थितीत अधिक असतात. सामाजीकरण ही प्रक्रिया
सातत्याने चालू असली तरी तिचा वेग कमी जास्त असतो.
२) दृष्टिकोनाची निर्मिती :- राजकीय सामाजीकरणाच्या माध्यमातून
प्रत्येक नागरिकामध्ये विशिष्ट दृष्टिकोन निर्माण होत असतात. प्रत्येक राजकीय
व्यवस्था निर्मितीच्या वेळेस काही मूल्यसोबत घेऊन जन्मास येते. ती व्यवस्था आपल्या
मूल्यांचे बीजारोपण व्यवस्थेतंर्गत राहणाऱ्या लोकामध्ये करत असते. त्या
मूल्यांच्या आकलनातून लोकांच्या राजकीय भूमिका बनत असतात. म्हणून प्रत्येक राजकीय
व्यवस्था आपल्या अनुकूल मूल्य, श्रद्धा, प्रेरणा, राजकीय संस्कार सामाजीकरण प्रक्रियेद्वारे
करत असते. त्यासाठी विविध कार्यक्रम, कायदे, घोषणा व आपल्या कार्याच्या माध्यमातून राजकीय सामाजीकरण करण्याचा प्रयत्न
राजकीय व्यवस्थेकडून केला जात असतो. उदा. लोकशाही शासन व्यवस्थेत राहणारा
नागरिकांचे सामाजीकरण लोकशाही मूल्य आणि श्रद्धा रूजवून केले जात असल्यामुळे त्यांच्यात
लोकशाही दृष्टिकोन विकसित होत असतो.
३) सुप्त वा उघड स्वरूपातील कार्य :- सामाजीकरणाची प्रक्रिया
समाजात दोन प्रकार घडत असते. काही वेळेस सामाजीकरण कळतनकत वा आपोआप घडते तर काही
वेळा हेतूपुरस्कर सामाजीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. सामाजीकरणाची
प्रक्रिया काही वेळेस सुप्त स्वरूपात कार्यरत असते. आजच्या गतिमान व
गुंतागुंतीच्या जीवनात राजकीय विचाराचा प्रवाह अखंडपणे चालू असतो. रेडिओ, चर्चा, वर्तमानपत्रे, संसूचन माध्यमे, राजकीय पक्ष, निवडणूक
प्रचार यातून राजकीय संस्कार मानवाच्या मनःपटलावर सतत आदळत असतात. या परिस्थितीत
जे ऐकले, बोलले, पाहिले जाते त्याचा
व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडत असतो यातील काही गोष्टी व्यक्ती नकळतपणे स्वीकारत
असते त्यास सुप्त राजकीय सामाजीकरण असे म्हणतात. एखादया घरात आई वडिल विशिष्ट
पक्षाच्या विचाराने भारलेले असतील. त्या पक्षाच्या लोकाचे येणे जाणे व चर्चा सुरू
असते. पक्ष नेत्याचे फोटो घरात असतील तर या वातावरणाचा परिणाम त्या घरातील मुलांवर
होतो. त्या घरातील मुलांना हेतूपुरस्कर राजकीय शिक्षण दिले जात नाही मात्र नकळत
राजकीय क्षेत्राशी संबंध येत असतो. रस्त्याने एखादी व्यक्ती जात असतांना
रस्त्याच्या बाजूला चालू असलेल्या सभेतील भाषण नकळत तिच्या कानावर पडते आणि
त्यातून तिचे विचार तयार होऊ शकतात. या व्यक्त वा गुप्त स्वरूपाचे सामाजीकरण असे
म्हणतात. याउलट राजकीय सामाजीकरण घडवून आणण्यासाठी एखादी व्यक्ती, संस्था किंवा व्यवस्था जाणीवपूर्वक प्रयत्न करत असेल तर त्या सामाजीकरणास
उघड स्वरूपाचे सामाजीकरण असे म्हणतात. शाळा व महाविद्यालयात जे राजकीय शिक्षण दिले
जाते ते उघड स्वरूपाचे असते. महाविद्यालयात वर्ग प्रतिनिधीची निवड होते. त्यामुळे
लहान वयात निवडणूक म्हणजे काय यांची ओळख होऊन सामाजीकरण घडून येते. एखादी राजकीय
संस्था आपल्या संस्थेची तात्त्विक भूमिका रूजविण्यासाठी अभ्यासवर्ग, कार्यशाळा आणि अधिवेशन घेते त्यास उघड राजकीय सामाजीकरण मानले जाते.
हुकूमशाही देशात बालपणातच सक्तीने हुकूमशाहीला अनुकूल सामाजीकरण घडवून आणले जाते.
४) अनुभवजन्य प्रक्रिया- राजकीय सामाजीकरण ही अनुभवजन्य
प्रक्रिया आहे. राजकीय सामाजिकरण ही प्रक्रिया अनुभवावर आधारलेली आहे. समाजातील
प्रत्येक घटकाला राजकीय घडामोडीचा अनुभव येतात. निरनिराळया राजकीय प्रसंगातून
व्यक्तीला राजकीय शिक्षण मिळत असते. या शिक्षणातून एखादा विचार किंवा कल्पना
स्वीकारायची की नाही याचा निर्णय घेत असते. म्हणून राजकीय सामाजीकरण प्रक्रियेत
अनुभवाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. सर्व लोकांचे अनुभव सारखे नसतात. त्यामुळे
सर्वाचे राजकीय सामाजीकरण सारख्या रितीने होत नाही. काही व्यक्ती अधिक संस्कारक्षम
असतात. त्यामुळे त्यांचे सामाजीकरण लवकर घडतें. अनुभवाच्या आधारे व्यक्ती राजकीय
निर्णय घेत असते. उदा. एखादया राजकीय पक्षा विषयी लोकांचा अनुभव चांगला नसेल तर
लोक निर्णय बदलतात. १९७७ च्या निवडणुकीत आणीबाणीच्या अनुभवामुळे लोकांनी काँग्रेस
पक्षाला मतदान केले नाही. केंद्रामध्ये गेल्या तीस वर्षांपासून आघाडीची सरकारे
स्थापन होत होती भारतीय जनता कोणत्याही एका पक्षाला बहुमत देत नव्हती या आघाडी
सरकारमध्ये समाविष्ट घटक पक्षाच्या राजकीय सौदेबाजीच्या अनुभवातून जनतेने २०१४
साली झालेल्या लोकसभा निवडणुक भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले दिसते.
५) प्रभावाची विविधता :- राजकीय सामाजीकरणाचे समाजातील वितरण
विषम स्वरूपाचे असते. राजकीय व्यवस्थेद्वारे दिले जाणारे संस्कार समान असले तरी
त्यांचा प्रभाव सर्वांवर सारख्या प्रमाणात पडत नाही. उदा. एखादा नेत्याचे भाषण
काहींना खूप आवडेल तर काहींना ते अजिबात आवडणार नाही. कोणी नेत्याच्या
शब्दरचनेवरून नाराज तर कोणी शब्दरचनेवरून खुश होईल कारण राजकीय सामाजीकरण ही
शैक्षणिक प्रक्रिया आहे. प्रत्येकांची ग्रहण व आकलन क्षमता भिन्न भिन्न असल्यामुळे
सामाजीकरणाचा वेगातही फरक असतो. उदा. मतदान प्रशिक्षणात एखादवाला नुसते
प्रात्यक्षिक दाखविले तरी तो शिकतो. काहींना प्रात्यक्षिक दाखवूनही प्रत्यक्ष कृती
करण्याची संधी द्यावी लागते. काही लोक वारंवार सूचना देऊन ही शिकत नाही काही लोक
एकदाच सूचना दिल्यावर शिकतात याचा अर्थ राजकीय सामाजीकरण एकाच पद्धतीने होत नाही.
प्रत्येकाच्या राजकीय सामाजीकरणाची प्रक्रिया दुसऱ्यापेक्षा भिन्न असते.
६) माध्यमातील विविधता- राजकीय सामाजीकरण घडवून आणणाच्या विविध
माध्यमाबाबत सर्वांचे अनुभव समान असत नाही. माध्यमाचा प्रभावात मोठया प्रमाणावर
विविधता दिसून येते. काही व्यक्तीचा वर्तमानपत्रातील बातमीवर खुप विश्वास असतो तर
काही टी.व्हीवर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात. काही व्यक्ती सभा, संमेलनाद्वारे होणाऱ्या प्रचाराला महत्त्व देतात तर
काही स्थानिक व प्रादेशिक निष्ठाच्या प्रभावातून राजकीय मते व्यक्त करतात तर काही
राष्ट्रीयतेच्या मताला महत्त्व देतात याचा अर्थ राजकीय सामाजीकरण घडवून आणणारी
माध्यमाच्या प्रभावातही विविधता दिसून येते.
७) सामाजीकरण ही एक संस्कार क्रिया :- सामाजिकरण ही जुनी
संकल्पना असून तिचा अभ्यास समाजशास्त्रात केला जात असे. आधुनिक काळात प्रत्यक्ष व
अप्रत्यक्ष प्रयत्नांनी सामाजीकरण घडवून आणले जाते. शासन वेगवेगळया योजना, रूढी व परंपरेच्या माध्यमातून सामाजीकरण करण्याचा
प्रयत्न करत असते. अनुकरण, शिक्षण व प्रेरणा या प्रक्रियेतून
सामाजीकरण घडवून आणले जाते.
अ) अनुकरण- व्यक्ती अनुकरणाने बऱ्याच गोष्टी शिकत असते.
परंपरावादी समाजामध्ये अनुकरणाचा प्रभाव जास्त असतो. राजकीय कार्यक्रम मूल्य आणि
दृष्टिकोन स्वीकारतांना बुद्धिनिष्ठ पद्धतीने विचार केला जात नाही, पूर्वापार चालत आलेला दृष्टिकोन तसाच स्वीकारला जातो.
पिढयापिढया एकाच पक्षाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती परंपरेतून राजकीय दृष्टिकोन
स्वीकारतात व्यक्ती चिकित्सक पद्धतीने राजकीय विचाराचा स्वीकार न करता मित्र,
गुरु, आपला प्रेरणास्थान यांनी स्वीकारलेल्या
मूल्यांचे अनुकरण करून राजकीय सामाजीकरण करत असतो. परंपरागत समाजात राजकीय विचार
किंवा कार्यक्रमाची स्वीकृती चिकित्सक पद्धतीने करण्याऐवजी भावनात्मक आधारावर करत
असतात.
व) शिक्षण- शिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळया गोष्टीचे ज्ञान
व्यक्ती प्राप्त करत असते. ज्ञान बाढविणे, दृष्टिकोन अधिक बुद्धिनिष्ठ बनविणे हा शिक्षणाचा प्रधान हेतू असतो.
शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आपले पूर्वग्रह, गैरसमज आणि
अज्ञानाला दूर सारून सारासार विचार करून राजकीय मूल्यांना स्वीकृती देत असतो.
शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या ज्ञानात प्रगभता आणि परिपक्कता येत जाते.
म्हणून सुशिक्षित व्यक्तीचा राजकीय दृष्टिकोन अज्ञाना व्यक्तीपेक्षा भिन्न असतो.
क) प्रेरणा :- काही व्यक्ती इतरांच्या अनुकरण किंवा नक्कल करून
तर काही व्यक्ती शिक्षणातून राजकीय सामाजीकरण होत असते. मात्र काही व्यक्तीचे
राजकीय वर्तन वा कृती प्रेरणा व चेतनेवर अवलंबून असते. त्यांना चेतना
मिळाल्याशिवाय ते कार्य तत्पर होत नाही.
या तीन प्रक्रियातून व्यक्तीचे सामाजीकरण घडवून आणले जाते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
If you have any donuts. Lets me Know.